दिलीप मोहिते विटा : खानापूर तालुक्यात झालेल्या चार ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या गटाला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संयुक्त गटाला दोन ग्रामपंचायत मिळाले. राजधानी भेंडवडीत शिवसेना आमदार बाबर गटाला धक्का बसला असून येथे विरोधी गटाने सत्तांतर घडवून आणले आहेत. या चार ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचा सामना आजी-माजी आमदारांच्यात बरोबरीत सुटला आहे.खानापूर तालुक्यातील साळशिंगे, राजधानी भेंडवडे, देवनगर व गावठाण भेंडवडे या चार ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. सोमवारी विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह गायकवाड यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली.या निवडणुकीत विद्यमान आ. अनिल बाबर गटाला देवनगर व गावठाण भेंडवडे येथे सत्ता मिळाली असून गावठाण भेंडवडे येथे राष्ट्रवादीचे युवा नेते राजू जानकर यांना धक्का देत विद्यमान आमदार बाबर गटाने सत्ता काबीज केली आहे.तसेच माजी आमदार सदाशिवराव पाटील व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संयुक्त गटाने राजधानी भेंडवडे येथे सत्तांतर घडवून आणले असून आ. बाबर यांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. याच गटाने साळशिंगे ग्रामपंचायतीची सत्ता कायम ठेवली आहे. या गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार छाया भीमराव पवार या केवळ पाच मतांनी विजयी झाल्या आहेत.
खानापूर तालुका ग्रामपंचायत निकाल :-
देवनगर - शिवसेना सत्ता कायम.विशाल सुभाष पवार - सरपंच सर्व ७ सदस्य बिनविरोध. (आ. अनिल बाबर गट शिवसेना सत्ता )
राजधानी भेंडवडे - सत्तांतर शिवसेना आ. अनिल बाबर गटाला धक्का. स्नेहल विशाल पाटील - सरपंच (आ. गोपीचंद पडळकर व माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाची सत्ता)
गावठाण भेंडवडे - सत्तांतरराष्ट्रवादीचे राजू जानकर यांना धक्का.तिरंगी लढत वैभव जानकर - सरपंच (शिवसेना आ. अनिल बाबर गटाची सत्ता)
साळशिंगे - सत्ता कायममाजी आ. सदाशिवराव पाटील व आ. पडळकर गटाची सत्ता.छाया भीमराव पवार - सरपंच सरपंच पदावर विराजमान झालेल्या श्रीमती छाया पवार या पाच मतांनी विजयी झाल्या आहेत.याच ग्रामपंचायतच्या प्रभाग ३ मधील सदस्य पदाच्या दोन उमेदवाराना समान २९१ मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून निकाल जाहीर करण्यात आला. यात माजी आ. सदाशिवराव पाटील गटाच्या ज्योती संतोष यादव विजयी झाल्या.निवडणुकीचा निकाल - आ. अनिल बाबर शिवसेना - २ देवनगर, गावठाण भेंडवडे.माजी आ. सदाशिवराव पाटील व आ. गोपीचंद पडळकर गट - २ साळशिंगे, राजधानी भेंडवडे.