सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून स्ट्रॉबेरी महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गाव आता ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून ओळखलं जाणार आहे. महाराष्ट्रातील या पहिल्या-वहिल्या प्रकल्पाचा प्रारंभ गुरुवार, दि. ४ मे रोजी होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक साहित्यिक, प्रकाशक उपस्थित राहणार आहेत.वेल्स प्रांतात ‘हे आॅन वे’ या गावी ‘बुक व्हिलेज’ची संकल्पना यशस्वीरीत्या प्रत्यक्षात उतरविली गेली आहे. याची कीर्ती महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकारातून असंच एक गाव उभारण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावरील भिलार गावी हा प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा २०१५ मध्ये केली गेली. स्ट्रॉबेरीचं गाव भिलारं आता ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून नावारुपास येणार असून, दहा हजारांपेक्षाही जास्त पुस्तके भिलार गावी आली आहेत. २६ पेक्षाही अधिक शाळा, लॉज, दुकाने अन् घरांमध्ये वाचनालय उभारण्यात आले आहेत. महाबळेश्वर परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मुकामाच्या काळात मराठी साहित्याचे दर्शनही व्हावे, ही मूळ संकल्पना या प्रकल्पामागे आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अन् मराठी विश्वकोश मंडळ यांच्या संयुक्त उपक्रमातून महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबविला आहे. (प्रतिनिधी)
‘पुस्तकांच्या गावा’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By admin | Published: May 03, 2017 11:16 PM