कोकरूड : वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी वंचित शेतकऱ्यांना मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. नाठवडे (ता. शिराळा) येथे स्थानिक आमदार विकास निधीतून तीन लाख रुपये खर्चाच्या विकासकामांच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
आमदार खोत म्हणाले की, वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी योजनेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. बऱ्याच दिवसांपासून शेतकरी योजनेचे पाणी मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असून, लवकरच हा मुद्दा मार्गी लावण्यात येईल.
सरपंच बाजीराव मोहिते यांनी आमदार सदाभाऊ खोत यांचा सत्कार केला. यावेळी सागर खोत, सत्यजित कदम, प्रमोद पाटील, दिनकर शेडगे, शकील मुजावर, तानाजी मोहिते, सुरेश पाटील, सर्जेराव कांबळे, बळवंत मोहिते, सुभाष मोहिते, आदी उपस्थित होते.