वाटेगाव : कोरोनाच्या महामारीमुळे बहुतांश नोकरदारांना, विद्यार्थ्यांना नोकरी गमवावी लागली किंवा कंपन्यांकडून त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. अशा सर्वांना विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी एच. आर. फॉर. यु फोरमची लिंक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. त्याचा लाभ विद्यार्थी व युवकांनी घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती रवींद्र बर्डे यांनी केले.
वाटेगाव (ता. वाळवा) येथे रवींद्र बर्डे व पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुहास कदम यांच्या हस्ते एनसीपी एचआर फॉर यु फोरमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रवींद्र बर्डे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे व संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे व्यवस्थापन उपाध्यक्ष अनुप करांडे हे एनसीपी एचआर फॉर यु फोरमचे काम पाहात आहेत. ते विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुहास कदम यांनी ऑनलाईन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय व्यवस्थापन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनुप करांडे यांचा शेतकरी मित्र व सर्व संचालकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. बर्डे गुरुजी सोसायटीचे अध्यक्ष सचिन बर्डे, उदय शेटे, मोहन जाधव, सुनील ढेबे, योगेश शिंदे, राजू शेटे, अशोक शेटे, पियुष करांडे, नागनाथ जाधव, शीतल शेटे उपस्थित होते.
फोटो : ११०१२०२१-आयएसएलएम- वाटेगाव न्यूज
ओळ : वाटेगाव येथे एनसीपी एचआर फॉर यु फोरमचे उद्घाटन रवींद्र बर्डे यांच्याहस्ते झाले. यावेळी अनुप करांडे, सचिन बर्डे उपस्थित होते.