ओळ :
मिरज येथे महापालिकेने उभारलेल्या वारकरी भवनाचे उद्घाटन शुक्रवारी पंढरपूर येथील आजरेकर फडाचे प्रमुख हरिदास बोराटे महाराज व आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मिरज : मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या वारकरी भवनाचे उद्घाटन पंढरपूर येथील आजरेकर फडाचे प्रमुख हरिदास बोराटे महाराज व आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कर्नाटक, कोकण व सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून पायी चालत पंढरपूर वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. वारकरी व दिंड्या मिरजेतून जात असल्याने येथे वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी, अशी वारकरी संप्रदायातर्फे मागणी करण्यात आली होती. भाजप शासनाने महापालिकेस विकासकामासाठी दिलेल्या १०० कोटी निधीतून प्रभाग चार व पाचमधील नगरसेवकांच्या सहकार्याने वारकरी भवन उभारणीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली होती. एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना व दिंडीला राहण्याची व विश्रांतीची सोय वारकरी भवनात करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश आवटी, मोहन व्हनखंडे, सुमन खाडे, नगरसेवक संदीप आवटी, निरंजन आवटी, नगरसेविका अनिता वनखंडे, शिवाजी दुर्वे, दिगंबर जाधव, बाळासाहेब काकडे, नंदकुमार बोंगाळे, ज्ञानेश्वर पोतदार महाराज, अरुण पोरे, दत्ता सर्वदे, गणेश अवसरे यांच्यासह विठ्ठल मंदिर, हरी मंदिर, गर्डर विठ्ठल मंदिराचे पुजारी उपस्थित होते.