सांगली : दिवाळीची धामधूम सुरू असताना चोरट्यांचाही सुळसुळाट वाढला आहे चोरट्याने ऊसतोड मजुरांच्या झोपड्याही गेल्या नाही. तुंग (ता. मिरज) येथे सहा ते सात झोपड्यात डल्ला मारत चोरट्याने रोकड रकमेसह सोन्या चांदीचे दागिनेही लंपास केले.
जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी सोलापूर बीड सह विविध जिल्ह्यातून ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गावाजवळच झोपड्या टाकून ते राहतात. तुंग येथे ऊस तोडणी मजुरांची टोळी गावालगतच राहत आहे. सोमवारी सर्व मजूर ऊस तोडणी साठी गेले असता चोरट्याने झोपडीमध्ये हात साफ केला.
नामदेव मासाळ यांच्या झोपडीतून चोरट्याने एक हजाराची रोकड, लक्ष्मण बंजात्री यांच्या झोपडीतून बाराशे रुपये व साडेपाच हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे दागिने, मीनाक्षी कोळी यांचे तीन हजार रुपये, पांडुरंग बंजत्री यांच्या झोपडीतून पायातील पैंजण, कानातील सोन्याची फुले असा पाच हजार रुपयांचा ऐवज व रोख दोन हजार रुपये, गणपती बंजत्री यांचा जुना मोबाईल व पाच हजार रुपये, नागेश तेरवे यांचे दहा हजार रुपये व चांदीचे कडे, शिवाजी तुरई यांच्या झोपडीतून दोन हजार रुपये असा जवळपास 47 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.