सांगली : अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीपुलावर गेल्या दोन दिवसांपासून शेमटी (मेप्लाय) किटकांच्या झुंडीच्या झुंडी वाहनधारकांसमोर येत असल्याने अपघात होत आहेत. मृत कीटकांचा खच पडल्यामुळे पुलाचा रस्ताही निसरडा बनल्याने वाहनधारकांना कसरत करीत ये-जा करावी लागत आहे.सांगली-कोल्हापूर रोडवरील अंकली पुलावर शुक्रवारी अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी झाले. याचा व्हिडिओ (चित्रीकरण) आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मेप्लाय हे या कीटकाचे शास्त्रीय नाव असले तरी त्याला मराठीत शेमटी असे म्हटले जाते. नदी, नाले, तलाव अशा पाण्यावर वाढणारे व जन्म घेणारे हे जलीय किटक असतात. एकावेळी मोठ्या संख्येने म्हणजेच लाखोंच्या संख्येने याच्या झुंडी बाहेर पडतात. अशाच झुंडी आता अंकलीच्या पुलावर गेल्या दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहेत.
शुक्रवारी या कीटकांनी अनेक अपघात घडविले. मृत कीटकांचे खच रस्त्यावर पडले होते. त्यांमुळे रस्ते निसरडे होऊन वाहने घसरत होती. मोठ्या वाहनांच्या काचाही या कीटकांनी आच्छादल्या होत्या. त्यामुळे अत्यंत मंदगतीने वाहने या पुलावर मार्गक्रमण करीत होती. त्यामुळे दुचाकीस्वार घसरूनही त्यांच्या जीवावर बेतले नाही. अन्य वाहने गतीने जात असती तर कदाचित याठिकाणी अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले असते.कीटकांचे वैशिष्ट्यमेप्लाय यांच्या जगभरात जवळपास अडिच हजार प्रजाती आहेत. त्यांची लांबी ३ ते ३0 मिलिमीटरपर्यंत असते. एफिमेरोप्टेरा गणातील मऊ अंगाचे हे कीटक आहेत. तळी, सरोवरे, नाले, नदया यांच्या काठांवर सायंकाळी सूर्यास्तानंतर ते थव्याथव्याने दिसतात. ते दिव्याकडे फारच आकर्षिले जातात. त्यांचे आयुष्य फक्त सहा ते सात तासांचे असते; परंतु त्यांची डिंभकावस्था मात्र तीन वर्षांपर्यंत असते. या कीटकांची अंडी व डिंभकावस्था पाण्यात पूर्ण होतात. डिंभक माशांचे उपयुक्त अन्न असल्यामुळे हे कीटक उपयोगी असतात. प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने हे किटक जन्म घेतात. त्यांची अंडी पाण्यात असतात.