लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : पंढरपूर आषाढी वारीत महायोगी गोरक्षनाथ महाराज दिंडीचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी शिराळा तालुका संघर्ष समिती, शिराळा तालुका पत्रकार संघ, कोटेश्वर महिला मंडळ व श्री समस्त वारकरी संप्रदाय मंडळ यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
शासनाने ज्या दहा पालख्यांना परवानगी दिली आहे, त्यामध्ये गोरक्षनाथ दिंडीला परवानगी नाही. हे पाहून येथील वारकरी यांना धक्का बसला आहे. पंचक्रोशीतील वारकरी व भक्तगणामध्ये गोरक्षनाथ दिंडीचा समावेश व्हावा, ही तीव्र इच्छा आहे. तरी वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन दिंडीचा समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांना उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
यावेळी भगवानराव पाटील, सम्राटसिंह शिंदे, सुमंत महाजन, रवींद्र कदम, विजय पाटील, डॉ. उज्ज्वला पाटील, सुशीला कुरणे उपस्थित होते.