दिलीप मोहितेविटा : गेल्या दोन महिन्यापूर्वी मयत झालेल्या विटा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा त्यांच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रक्कमेचा धनादेश काढण्यासाठी मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांकडून २५ हजाराची लाच घेताना विटा नगरपालिकेचा मिळकत कर व्यवस्थापक पुंडलिक हिरामण चव्हाण (वय ४९, मूळगाव मोहनदरे, ता. कळवण, जि. नाशिक, सध्या रा. साळशिंगे रोड, विटा) यास रंगेहाथ पकडले. सांगलीच्या लाचलुचपत विभागाने बुधवारी दुपारी ही कारवाई केली.विटा नगरपालीकेच्या एका कर्मचाऱ्याचा गेल्या दोन महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रक्कमेचा धनादेश काढण्यासाठी त्यांचा मुलगा वारंवार मिळकत व्यवस्थापक पुंडलिक चव्हाण याच्याकडे पाठपुरावा करीत होता. त्यावेळी चव्हाण याने या कामासाठी २५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. मयत कर्मचाऱ्याच्या मुलाने याबाबत दि. २० डिसेंबरला सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार लाचलुपतच्या अधिकाऱ्यानी बुधवारी विटा हायस्कूलजवळ सापळा लावला.त्यावेळी पुंडलिक चव्हाण याने मयत कर्मचाऱ्याच्या मुलाकडून २५ हजार रूपयांची लाच स्वीकारल्यानंतर त्याला तात्काळ रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याविरूध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या लाचलुचपतचे उपअधिक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, ऋषीकेश बडणीकर, सलीम मकानदार, अजित पाटील, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, सीमा माने, उमेश जाधव यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे प्रशासन चांगलेच हादरले आहे.
७ महिन्यातील दुसरी कारवाई..बांधकाम परवान्यासाठी २ लाख रूपयांची लाच घेताना विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना दि. १५ मे रोजी अटक केली होती. आता नगरपालीकेच्या मयत कर्मचाऱ्याच्या मुलाकडून २५ हजाराची लाच घेताना मिळकत व्यवस्थापक पुंडलिक चव्हाण रंगेहाथ सापडला. त्यामुळे विटा पालिकेतील दोन अधिकारी सात महिन्याच्या अंतरात लाच घेताना सापडले.