सांगली : राज्यातील सध्याचे सरकार जनता, शिक्षणसंस्था आणि शिक्षकांच्या प्रश्नाकडे काही लक्ष देत नाही. तुम्ही महाविकास आघाडीला संधी द्या, राज्याचे आगामी मुख्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम असणार आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्रीही आपलाच असणार आहे, असे विधान काँग्रेस खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा केले. या विधानावर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी "याची बातमी करू नका नाही तर सगळं जग राहिलं बाजूला दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागेल, असे म्हणत विश्वजित कदम यांनी जिल्हास्तरीय राजकारणावर लक्ष वेधले."सांगलीतील शांतिनिकेतनमध्ये गुरुवारी जिल्ह्यातील शाळांना आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून प्रिंटर वाटप केले. या कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते. विशाल पाटील यांनी विश्वजित कदम यांची ओळख करून देताना "आपल्या जिल्ह्याचे मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसेच मुख्यमंत्री व्हायला काय भविष्यवाणी लागत नाही. त्याला पंचांग वगैरे देखील बघावे लागत नाही" असे विधान केले आणि जमलेल्या साऱ्या कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.तर याला उत्तर देताना विश्वजित कदम यांनी देखील विशाल पाटील यांच्या स्तुतीला उत्तर दिले, "बोलण्याच्या ओघांमध्ये विशाल पाटील यांनी माझा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. परंतु याची कोणीही बातमी करू नका. याची बातमी केली तर सगळं जग राहील बाजूला दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागते" असे म्हणत विश्वजित कदम यांनी राजकीय टोला लगावला.
आसगावकर आमचे जावईखासदार विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात ‘आमदार जयंत आसगावकर हे आमचे जवळचे नातेवाइक आहेत. त्यांच्या विजयात आमचा सहभाग होता. पण, त्यांच्या प्रत्येक उपक्रमास आमचा पाठिंबा असतो’, असे विधान केले. हाच धागा पकडून डॉ. विश्वजित कदम यांनी आपल्या भाषणात ‘आसगावकर तुमचे नातेवाइक असतील. पण, त्यांची सासरवाडी माझ्या मतदारसंघातील तुपारीची आहे. त्यामुळे ते आमचे जावई आहेत. त्यामुळे ते तुमचे नातेवाइक असले तर आमचे जावई असल्यामुळे आमच्या खूप जवळचे आहेत’, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.