लोकमत न्यूज नेटवर्क
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरात महसूल विभागाच्यावतीने नदीकाठची माती व वाळू उपसा करण्यास बंदी असल्याने वीट व वाळू व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याचा परिणाम म्हणून नागरिकांनी आता कोकणातील चिरे विटांना, तर खडीची ग्रेट वापरून बांधकामाची कामे सुरू केली आहेत.
तांदूळवाडी परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, कणेगाव, भरतवाडी, बहादूरवाडी गावांतील अनेक नागरिकांनी घर बांधकामासाठी सुरुवात केली आहे. पण, गेल्या सहा वर्षांपासून महसूल विभागाच्यावतीने नदीकाठची माती व वाळू काढण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लाल मातीच्या वीट निर्मितीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच मातीच्या विटांचे दर हे न परवडणारे झाले आहेत. सध्याच्या स्थितीत एक फुटाच्या विटाचा दर हा एक हजारी चौदा हजार रुपये, तर अर्धा फूट वीट ही सात हजार रुपये अशी मिळते. हा दर न परवडणारा आहे. याचा विचार करीत बऱ्याच नागरिकांनी घराचे बांधकाम चिरे विटा वापरून सुरू केले आहे.
शिवाय बांधकाम व्यावसायिकांच्या मताने चिऱ्यांच्या विटांचे बांधकाम कमी मालात व गतीने होते. त्यामुळे सध्या या विटांना प्राधान्याने महत्त्व दिले जाते. बऱ्याच बांधकाम व्यावसायिक व घरगुती मालक खडीच्या ग्रिटला जास्त महत्त्व देत आहेत. या ग्रिटमध्ये सिमेंटचे प्रमाण वाढविले तर मजबूत काम होते, असे मत बांधकाम व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. याचा परिणाम म्हणून तांदूळवाडी परिसरात चिरांच्या विटा व ग्रेटला मागणी वाढत आहे.