सांगली : सांगली शहर आणि जिल्ह्यात १ जानेवारीपासून दळपाची दरवाढ करण्यात येणार आहे. विजेचे वाढलेले दर आणि वाढती महागाई यामुळे दरवाढ करणे भाग पडत असल्याची माहिती सांगली शहर गिरणी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश क्षीरसागर यांनी दिली.
ते म्हणाले की, पाच-सहा वर्षांत दळपाच्या दरात अजिबात दरवाढ केली नव्हती. पण गेल्या दोन-तीन वर्षांत विजेचे दर सातत्याने वाढत आहेत. त्याशिवाय महापालिकेचे कर, गिरणीचे सुटे भाग यांची सातत्याने दरवाढ सुरू आहे. त्यास तोंड देण्यासाठी दळपाच्या दरवाढीशिवाय पर्याय नाही. तसा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी प्रकाश क्षीरसागर, माणिकराव काटकर, संदीप होनवाडे आदी उपस्थित होते.
चौकट
नवे दर असे असतील...
१ जानेवारीपासून नवे दर असे असतील : गहू, ज्वारी प्रति किलो सहा रुपये. तांदूळ, बाजरी, नाचणी, डाळ, भाजणी, इडली, ढोकळा, रवा प्रतिकिलो आठ रुपये. मका, मेतकूट, साबुदाणा प्रतिकिलो १० रुपये.
चौकट
घरगुती आटा चक्कीमुळे फटका
लॉकडाऊनच्या काळात दळणाचे काम घरीच करण्याकडे कल वाढला. घरोघरी छोटी आटा चक्की आली. घरचे दळप घरातच दळण्याची पद्धत सुरु झाली, शिवाय शेजाऱ्यांचेही दळण दळून देण्यास सुरुवात केली. विनापरवाना व्यावसायिक गिरण्या सुरू झाल्याचा फटका गिरणी व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.
---------------