सांगली : जगभर समानता, स्वातंत्र्य, न्याय या मूल्यांवर घाला घालण्याचे प्रकार वाढत आहेत. या काळात विचारवंतांच्या विचारांना नाकारले जात आहे, हे क्लेशदायक असून, मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली देऊन देशात जाती-धर्मामुळे, लिंगामुळे विषमतेचे वातावरण वाढत आहे. समाजात विषमतेने अक्षरश: थैमान घातले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी रविवारी सांगलीत केले.ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त सत्कार कार्यक्रम शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे आयोजित केला होता, यावेळी डॉ. देवी बोलत होते.डॉ. देवी म्हणाले, विशिष्ट विचारांची रुजवणूक व्हावी म्हणून समानता, स्वातंत्र्य, न्याय यासह इतर मूल्यांवर जगभर घाला घातला जात आहे. त्यामुळे अशा धोकादायक वातावरणातही मूल्यांची मशाल पेटत राहिली पाहिजे, यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यासारखे विचारवंत मूल्यांची मशाल पेटती राहावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. या काळात विचारवंतांच्या विचारांना नाकारले जात आहे किंवा त्यांना दाभोलकर, पानसरे यांच्यासारखे मारले जात आहेत. विचारांना ठोकून होत असलेली हत्या ही शारीरिक हत्येपेक्षा अधिक क्लेशदायक ठरत आहे.आ. ह. साळुंखे यांच्याविषयी ते म्हणाले, एक पुस्तक लिहिणे म्हणजे एका नव्या जिवाला जन्म देण्यासारखे आहे. बुध्दीच्या प्रसववेदना पत्करून ६० पेक्षा अधिक ग्रंथ लिहिणे हे अद्वितीय कार्य ‘आ. ह.’ यांनी केले आहे. त्यांच्या विचारांची मोहिनी समाजावर पडली आहे. त्यांच्या अनेक ग्रंंथांतून विशिष्ट मूल्यांची जोपासना होत आली आहे. आता त्यांना दीर्घायुष्य मिळून, शंभरावर ग्रंथांचे लेखन त्यांच्याकडून व्हावे.
देशात धर्मांधतेच्या वातावरणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 11:37 PM