सांगली : जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे आतापर्यंत सात रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील सहा तर विटा नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. या आजाराबाबत प्रतिबंध व नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.दुधोंडी, रायवाडी, बांबवडे येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे. सध्या सावळज, रावळगुंडवाडी आणि खरसुंडी येथील प्रत्येकी एका रुग्णावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३० जणांवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत इन्फ्ल्यूएंझाला प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत.कोविड-१९ या आजाराच्या व इन्फ्ल्यूएंझा एएच१ एन१ प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना सारख्याच आहेत. प्रत्येक फ्ल्यू सदृश रुग्णाच्या कोविड सोबतच इन्फ्ल्यूएंझा तपासणी देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि सर्व आरोग्य संस्थांमध्ये फ्ल्यू सर्वेक्षणाचे काम नियमितपणे चालू ठेवण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले. या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिल्या आहेत.
फ्ल्यूसदृश रुग्णांची लक्षणे
ताप, घसादुखी, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी. तसेच बालरुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरुपाचा ताप आढळतो, घसादुखी असणाऱ्या बाळामध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळताना आढळते. काही रुग्णांना जुलाब उलट्या होतात. संशयित फ्ल्यू रुग्णाच्या नाक अथवा घशातील स्रावाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येतो. राज्यातील सर्व आयसीएमआर मान्यताप्राप्त कोविड निदानासाठी कार्यरत आरटी पीसीआर प्रयोगशाळेमध्ये इन्फ्ल्यूएंझा निदान केले जात आहे, अशी माहिती डॉ. माने यांनी दिली.