सांगली : केंद्र सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्नाची मर्यादा एक लाखाहून एक लाख ५० हजार रुपये करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर, नोटीस बोर्डवर निर्गमित कराव्यात, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संभाजी पोवार यांनी केले आहे.
------
पाऊस लांबल्याने झाडे करपू लागली
सांगली : पावसाळ्यास सुरुवात झाल्यानंतर लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी करपू लागली आहेत. मान्सूनने यंदा वेळेत आगमन केले असले तरी त्यानंतर मात्र दडी मारली आहे. यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्यानंतर सामाजिक वनीकरणासह इतर यंत्रणा व खासगी संस्थांनीही काही प्रमाणात वृक्षारोपण आयोजित केले होते. सध्या पाऊस लांबल्याने मात्र अडचणी वाढल्या आहेत.
--------
खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
सांगली : खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलैपूर्वी व इतर खरीप पिकांसाठी ३१ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मास्तोळी यांनी सांगितले.