सांगली : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत नव उद्योजक, व्यावसायिकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्याअनुषंगाने बँकांमार्फत वितरीत केल्या जाणाऱ्या कर्जपुरवठ्यात जिल्हा बँकेच्या कर्जवाटपाचे प्रमाण अत्यल्प आहे. ते वाढविण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे सोमवारी जिल्हा बँकेकडे करण्यात आली.क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, नितीन चव्हाण, राहुल पाटील यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांना दिले. यावेळी खासदार विशाल पाटील, बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, संचालक पृथ्वीराज पाटील, सत्यजित देशमुख, वैभव शिंदे उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना अमलात आणली आहे. जिल्हा बँकेचा जिल्ह्यातील विस्तार पाहता या योजनेअंतर्गत बँकेतून अत्यल्प कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत. कित्येक शाखांमध्ये या योजनेची माहितीही उपलब्ध नाही.बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये या योजनेचे माहिती सभासदांना द्यावी, योजनेअंतर्गत व्याज परतावा मिळत असल्यामुळे महाराष्ट्रभर प्रकरणांचे एनपीए प्रमाण केवळ १ टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे बँकेने योजनेअंतर्गत कर्जवाटप वाढवावे, अशी मागणी करण्यात आली. बँकेचे एक पाऊल नव उद्योजक, व्यावसायिक घडविण्यास मोठा हातभार लावणारे ठरू शकते.
अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी कर्जवाटप वाढवा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी
By अविनाश कोळी | Published: June 24, 2024 6:34 PM