सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अगोदरच जनजीवन विस्कळीत बनले असताना, कुटुंबातील कलह वाढतानाचे चिंताजनक चित्र आहे. अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय व अशाच कौटुंबिक कलहातून खुनाच्या घटना या पंधरवड्यात घडल्या आहेत. मांजर्डे (ता. तासगाव) येथील दुहेरी खून वगळता इतर सर्व खुनाच्या घटना या कौटुंबिक कारणाने झाल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे बिघडलेले आर्थिक गणित, घरातच थांबण्याचा वाढलेला काळ आणि त्यामुळे वाढलेल्या वादाच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असतात. यातून वादावादीसह मारहाण आणि इतर गुन्हेही पोलिसांनी दाखल केले आहेत. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीपासूनच घडलेल्या खुनाच्या घटना या पूर्णपणे क्षणिक कारणावरून घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनाही त्यावर नियंत्रण मिळवताना आव्हान येत आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीलाच तासगाव तालुक्यात मांजर्डे येथील दुहेरी खुनाने जिल्हा हादरला होता. खुनामागील नेमके कारण आणि संशयिताच्या तपासाचेही पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे या दुहेरी खुनातील संशयिताला पोलिसांनी अटक केली.
जत तालुक्यातील खिलारवाडी येथे मामानेच भाच्याचे अपहरण करून खून केल्याची घटना घडली. मुलीला पळवून नेल्याच्या रागातून ही घटना घडली होती. या खुनाच्या घटनेपासून कौटुंबिक विसंवाद, रागामुळे ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी सर्व चार संशयितांना अटक केली.
कोणतीही खुनाची घटना घडली की त्यामागे रम, रमा आणि रमी हेच कारण असल्याचे अनेकदा स्पष्ट होते. त्याचा तपास करतानाही पोलीसही हीच बाजू तपासून संशयितांपर्यंत पोहोचत असतात. आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथील खुनाची घटना अनैतिक संबंधातून तर मिरजेत चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीचा केलेला खून या घटनांमागे क्षणिक कारण असल्याने पोलिसांना अशा घटनांवर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. संघटित अथवा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश मिळाल्याने गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रणात असले, तरी कौटुंबिक कारणावरून होत असलेल्या या घटनांमुळे कौटुंबिक कलह आणि विसंवाद समोर आला आहे.
चौकट
राग आणि भीक माग
पंधरवड्यातील खुनाच्या घटनांचा मागोवा घेतला तर क्षणिक रागातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केलेला पतीचा खून, पतीने केलेली पत्नीची हत्या आणि राग मनात धरून मामाने केलेला भाच्याचा खून या घटनांत राग कारणीभूत ठरल्याने त्यांना कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.