सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी मोठी वाढ दिसून आली. महिन्याभरात १० ते १५ वर स्थिर असलेली बाधितांची संख्या वाढून २८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी आटपाडी तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला असून, २५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली शहरात सर्वाधिक १६ नवे रुग्ण आढळले आहेत.
या आठवड्यात दुसऱ्यांदा बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात पहिल्यांदाच २८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. महापालिका क्षेत्रात सांगली शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, तर कवठेमहांकाळ तालुक्यात पाच, जत तालुक्यात चार रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत २४१ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १२ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ११६२ चाचण्यांमधून १६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
उपचार घेत असलेल्या १२२ रुग्णांपैकी ३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात २४ जण ऑक्सिजनवर, तर ६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.