सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने तशा सूचना कर्नाटकला द्याव्यात, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सध्या अलमट्टी धरणात एक लाख १४ हजार ४०० क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून केवळ ६७०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, असेही समितीने निवेदनात म्हटले आहे.निवेदनात म्हटले की, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. सांगलीत कृष्णा नदीत पाणी पातळी १७ फुटांवर गेली आहे. कोल्हापुरात पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. कृष्णा, वारणा नद्यांचीही तीच परिस्थिती असल्यामुळे आलमट्टी धरणातून किमान एक लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढविण्याच्या सूचना कर्नाटकला द्याव्यात. यावर्षी पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सचिव स्तरावरील बैठक झाली नाही, ती तत्काळ घेण्याची गरज आहे. निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, विजयकुमार दिवाण, धनाजी चुडमुंगे आदींनी निवेदन पाठवले आहे.पूर रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करा : पाटीलपूर येऊच नये, यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन करण्याची गरज आहे. सूचनांचे पालन न करता धरणातील पाणीसाठा केला जात आहे. पुन्हा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास नदीत विसर्ग वाढविला जाईल. यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे सर्जेराव पाटील म्हणाले.
अलमट्टी धरणातून त्वरित विसर्ग वाढवा, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By अशोक डोंबाळे | Updated: July 24, 2023 18:17 IST