कसबे डिग्रज :
कृष्णा नदीकाठावरील कसबे डिग्रजला नेहमीच पुराचा धोका असतो. महापुरातून बाहेर जाण्यासाठी असलेल्या गंजीखाना रस्त्याची उंची पाच फुटांनी वाढविण्याची मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य विशाल चौगुले यांनी केली आहे.
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे नायब तहसीलदार अर्चना पाटील यांनी आढावा बैठक घेतली. आगामी काळातील संभाव्य पूर परिस्थिती, उपाययोजना, अडचणीबाबत बैठक झाली. मागील काळात केलेल्या गोष्टी आणि पुढील काळात संभाव्य परिस्थितीमध्ये उपलब्ध असणारी साधणे, आवश्यक तांत्रिक बाबी, लाइफ जाकीट, यांत्रिक बोटी, लोकांची राहण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, विविध पर्याय याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. पूर परिस्थितीत लोकांना गावाबाहेर जाण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्ग असलेल्या गंजीखाना रोडची उंची वाढवून रस्ता व्हावा यासाठी तहसीलदार पाटील यांच्यासोबत, चौगुले, सहायक गटविकास अधिकारी अशोक बांगर यांनी पाहणी केली. कुमार लोंढे, संजय शिंदे, उपसरपंच सागर चव्हाण यांनी चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी संजय निकम, मंडल अधिकारी विजय तोडकर, ग्रामविकास अधिकारी आर. डी. शिंदे, तलाठी के. एल. रूपनार, डॉ. शरद कुंवर उपस्थित होते.
फोटो ओळ : कसबे डिग्रजमधील पुरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्याची पाहणी नायब तहसीलदार अर्चना पाटील, विशाल चौगुले, मंडल अधिकारी विजय तोडकर यांनी केली.