कुपवाड येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन नगरसेवक प्रकाश ढंग यांनी सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे सुविधांची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : कुपवाड येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन नगरसेवक प्रकाश ढंग यांनी सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे नागरिकांसाठी सुविधांची मागणी केली. तसेच कुपवाडमधील लसीकरण केंद्रावर लस वाढवून देण्याची मागणीही ढंग यांनी केली आहे.
शहरातील लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लस संपल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. अनेक वृद्ध उन्हात उभे राहत आहेत. लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाल्याने नगरसेवक प्रकाश ढंग यांनी कार्यकर्त्यांसह धाव घेऊन पाहणी केली. सर्व वैद्यकीय यंत्रणा सज्ज होती. मात्र, गर्दी जास्त झाली. वृद्ध लोक उन्हात उभे होते. लोकांना बसण्यासाठी घालण्यात आलेल्या मंडपाची दुर्दशा झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यानंतर ढंग यांनी सहायक आयुक्त गायकवाड यांना बोलावून घेत मंडप आणि खुर्च्यांची सोय करायला लावली.
डॉ. मयूर औंधकर यांनी, लस उपलब्ध असून सगळ्यांना लस मिळेल अशी माहिती दिली. पण, शांतता राखा, अशी विनंती केली.
नागरिकांनी लसीकरिता गोंधळ केल्याने पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे घटनास्थळी आले. त्यांनीही शांतता राखण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी ढंंग म्हणाले की, कुपवाडच्या चावडी जवळचे हे लसीकरण केंद्र मध्यवस्तीत आहे. इथं दररोज गर्दी होत असते. महापालिकेने लस वाढवूूूूून द्यावी. लस वितरणाचे रजिस्टरही आपण चेक करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. प्रकाश पाटील, स्वप्नील मगदूम दादासाहेब रूपनर यांनी लसीकरणासाठी आलेल्या वृद्ध लोकांना मदत केली. लसीकरण केंद्रावर सुविधा दिल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत होते.