सांगली : गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. सध्या जरी कोरोनास्थिती नियंत्रणात असली तरी, प्रत्यक्षात दिवसाला उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढच होत आहे. सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा वाढत असलेल्या रुग्णसंख्येत तीस वर्षांपेक्षा जादा वयाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या या दुसऱ्या टप्प्यात तरुणाई कोरोनाचे लक्ष्य ठरू पाहत आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सरासरी १० ते १५ रुग्णांची नोंद होत होती. त्यात चारपटीने वाढ झाली, तर आता गेल्या चार दिवसांपासून सरासरी १४० च्या वर रुग्ण सापडत आहेत. या रुग्णांचा वयोगट पाहिला, तर ३० ते ४५ वयोगटातील बाधितांची संख्या अधिक आहे, तर लहान मुलांचे प्रमाण कमी आहे. त्यानंतर ६५ वर्षांवरील ज्येष्ठांचे प्रमाण आहे. सध्या जिल्ह्यातील ५ रुग्णालयांत व एका केअर सेंटरमध्ये ११०० रुग्ण उपचार घेत आहेत, तर ९०५ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. एकूण १०९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे.
चौकट
१ मार्चपासूनची रुग्णसंख्या
१४८५
कोरोना रुग्णांची टक्केवारी
बारा वर्षाखालील ५
१२ ते १८ ५
१९ ते ३५ ४०
३६ ते ५० ३०
५१ पेक्षा अधिक २०
चौकट
मृतांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण जास्त
एक मार्चपासून कोरोनाने १६ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने दिलासा मिळाला आहे. या महिन्याभरात सरासरी आठवड्यात तीन मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्येही ज्येेष्ठ व अगोदरच व्याधी असलेल्या रुग्णांची संख्या आहे. तरीही ४० ते ५० वयोगटातीलही काही रुग्ण कोरोनाचा बळी ठरले आहेत.
कोट
कोरोनाविषयक काळजी घ्या
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असली तरी त्यात वाढ होत आहे. विनाकारण गर्दीत जाणे टाळावे व मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सध्या बाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण असले तरी, प्रत्येक वयोगटाने कोरोनापासून बचावासाठी काळजी घ्यावी.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक