लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दारू दुकाने वाचविण्यासाठी महापालिकेत रस्ते हस्तांतरणाचा घाट घातला गेल्याचा आरोप करीत स्वाभिमानी विकास आघाडीने गुरुवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांसह नागरिकांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. शनिवारी महासभेवेळी बांगड्या व पायताणासह निदर्शने केली जाणार आहेत. या आंदोलनाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. स्वाभिमानी आघाडीचे नेते नगरसेवक गौतम पवार, सचिव सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ते हस्तांतरणाविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. महापालिकेतील काही मंडळींनी दारू दुकानदारांकडून सुपारी घेऊन रस्ते हस्तांतरणाचा घाट घातला आहे. त्याला स्वाभिमानीचा विरोध आहे. महापौरांच्या कार्यालयातच बैठका सुरू असून, महासभेत ठराव होणार नाही याची खात्री जोपर्यंत पटत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशाराही देण्यात आला. खासदारांच्या बगलबच्च्यांकडून रस्ते ताब्यात घ्यावेत, यासाठी आर्थिक तडजोडी सुरू असल्याचा आरोपही पवार यांनी केला होता. शुक्रवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन स्वाभिमानीच्या मागणीला पाठिंबा दिला. उपमहापौर विजय घाडगे व नगरसेवक शेखर माने यांनीही आंदोलकांची भेट घेतली. उपमहापौर घाडगे यांनी स्वाभिमानीने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. महासभेत रस्ते हस्तांतरणाचा ठराव आल्यास आपण व्यासपीठावरून उतरून त्याला विरोध करू, अशी ग्वाही दिली. पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर आमचा विश्वास नसून, ते रस्ते हस्तांतरणाचा ठराव करणार नाहीतच, याची खात्री नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास नकार देण्यात आला. त्याशिवाय जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष रवींद्र काळोखे, मुनीर मुल्ला, उदय म्हारगुडे, विशाल पवार, अनिकेत खिलारे, सतीश पाटील, अशोक सत्याळ, अनिल शेटे, गजानन खरात, आशिष सावंत, प्रकाश नवलाई, कल्पना कोळेकर, नीलेश हिंगमिरे, सदाशिव रास्ते यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, शनिवारी महासभेदिवशी स्वाभिमानी विकास आघाच्यावतीने बांगड्या व पायताण घेऊन निदर्शने करण्यात येणार आहेत. ठरावाचे समर्थन करणाऱ्यांना बांगड्या व पायताण भेट देणार असल्याचा पुनरूच्चार पवार यांनी केला.
लाक्षणिक उपोषणाला वाढता पाठिंबा
By admin | Published: May 19, 2017 11:38 PM