सांगली : जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक, तर २६ ग्रामपंचायतीमधील २९ सदस्य व तीन सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीपैकी ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.शिराळा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीपैकी मादळगाव, करुंगली, धसवाडी, कदमवाडी, बेलेवाडी या पाच ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. यातील कदमवाडी सरपंच पदाची जागा रिक्त राहिली आहे. चिंचेवाडी येथील सरपंच बिनविरोध तर चिखलवाडी येथे सरपंच व एक सदस्यसाठी निवडणूक होणार आहे. इंगरुळ,, खुजगाव याठिकाणी तिरंगी तर इतर ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे.
आटपाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून त्यापैकी मुढेवाडी, आवटेवाडी, पुजारवाडी (आ) ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. १४ ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. करगणी, बनपुरीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. कडेगाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतीपैकी वाजेगाव ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली असून तीन ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील २० ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून १८ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे.
या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोधशिराळा तालुक्यातील मादळगाव, करुंगली, धसवाडी, कदमवाडी, बेलेवाडी, आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी, आवटेवाडी, पुजारवाडी (आ), कवठेमहांकाळ तालुक्यातील रामपूरवाडी, पिंपळवाडी, कडेगाव तालुक्यातील वाजेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
लक्षवेधी लढतीकारंदवाडी (ता. वाळवा) ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीविरोधात भाजपा व माजी आमदार विलासराव शिंदे गट, शेतकरी संघटना एकत्र आल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. सरपंच पदासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी कचरे यांच्या विरोधात व हिम्मत पाटील यांना मैदानात उतरवले आहे.
८४ ग्रामपंचायतीसाठी १७२३ उमेदवार रिंगणातजिल्ह्यातील ८४ ग्रामपंचायतीसाठी एक हजार ५०५ आणि सरपंच पदासाठी २१८ उमेदवार असे एकूण एक हजार ७२३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तसेच सात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सदस्य पदासाठी २१ आणि सरपंच पदासाठी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.