मिरज : मिरजेत शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेतर्फे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महापालिका प्रशासनास वारंवार निवेदने दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. म्हणूनच गुरुवारी शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेतर्फे मिरजेत महापालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सफाई कर्मचाऱ्यांना राहत असलेली घरे मालकी हक्काने मिळावीत, रोस्टर पध्दत सुरू करावी, केडर पद्धतीने पदोन्नती व नियुक्त्या द्याव्यात, कोविड साथीदरम्यान काम केलेल्या कर्मचाऱ्यांना भत्ता मिळावा, मृत कामगारांच्या वारसांना सेवेत घ्यावे, बदली कामगारांना कायम करावे, ड्रेनेज विभागाकडे साफसफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक पाळी काम द्यावे, शैक्षणिक अर्हता, सेवाज्येष्ठता व अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती द्यावी, या मागण्या मान्य होइपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत ढंग यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष रमेश लाड, महापालिका क्षेत्राध्यक्ष राजेश म्हेतर उपोषणात सहभागी आहेत.