सांगली : महावितरणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याच्या मागणीसाठी मागील आठवड्यात आंदोलन केले. मात्र, सरकारने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील ७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणा सलाईनवर असून, ५० टक्के काम ठप्प झाले. तसेच शासनाने आंदोलनावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी बुधवारी निदर्शने केली.कंत्राटी कर्मचाऱ्यांना शाश्वत रोजगार आणि नवीन भरती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी आंदोलकांची आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संघर्ष कृती समितीने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन केले आहे. या बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सातशेहून अधिक कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत.कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे महावितरणचे कामकाज ५० टक्क्यांहून अधिक ठप्प झाले आहे. महावितरणच्या वीज मंडळाच्या कंत्राटी कामगार संघटनेतर्फे प्रलंबित १६ प्रकारच्या मागण्यांबाबत यापूर्वी पाच टप्प्यांत आंदोलन केले होते. या पाच टप्प्यांतील आंदोलनांमध्ये राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे राज्यभरात महावितरणचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत.सांगलीतील विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. महेश जोतराव, दत्तात्रय पाटील, कंत्राटी कामगार महासंघाचे गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. राज्य सरकारने संपाबाबत तातडीने तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
सांगलीतील ७०० कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
By अशोक डोंबाळे | Published: March 06, 2024 6:20 PM