सांगली : राज्याच्या राजकीय पटलावर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचा लाखाच्या मताधिक्याने पराभव केला. मतदारसंघात हॅटट्रिक नोंदविण्याचे संजय पाटील यांचे स्वप्न भंगले, तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली. निवडणुकीनंतर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत विशाल पाटील यांच्या विजयाचा आनंद मंगळवारी साजरा केला.सांगली लोकसभा मतदारसंघातील जागावाटपावरून इंडिया आघाडीत बराच काळ राष्ट्रीय पातळीवर खल झाला होता. त्यामुळे हा मतदारसंघ सर्वांत चर्चेचा ठरला होता. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली होती. महाविकास आघाडीतर्फे चंद्रहार पाटील मैदानात उतरले होते. सुरुवातीला तिरंगी वाटणारी ही निवडणूक दुरंगी झाली. विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील असा चुरशीचा सामना या ठिकाणी झाला. यात विशाल पाटील यांनी बाजी मारली. पहिल्या फेरीपासून विशाल पाटील यांनी आघाडी घेतली होती. एकूण २५ फेऱ्यांमध्ये सातव्या व अठराव्या फेरीतच संजय पाटील यांना अल्प मताधिक्य मिळविता आले. पंचविसाव्या फेरीअखेर विशाल पाटील यांना एक लाखावर मताधिक्य मिळाले.विजयी झाल्यानंतर विशाल पाटील यांच्या समर्थकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरज व सांगली शहरांत मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण अन् विजयाच्या घोषणा देत विजयोत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेस भवनासमोर रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरू होता.
टपाली मतमोजणीत प्रक्रिया थांबलीसायंकाळी पाच वाजेपर्यंत २४ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली. मात्र, टपाली मतमोजणीत काही तांत्रिक त्रुटी आल्याने प्रक्रिया काही काळ थांबली. त्यामुळे अंतिम फेरी जाहीर होण्यास मोठा विलंब झाला.
ऐतिहासिक विजयाची नोंदसांगली लोकसभेच्या इतिहासात आजपर्यंत कधीही अपक्ष उमेदवाराला विजय मिळविता आला नव्हता. विशाल पाटील यांच्या माध्यमातून प्रथमच अपक्ष उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.
हॅट्रिकचे स्वप्न भंगलेभाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविले होते. त्यामुळे यंदा हॅटट्रिक नोंदविण्याचा विश्वास त्यांच्यासह समर्थकांना वाटत होता; पण त्यांचे हे स्वप्न भंगले. सांगली मतदारसंघाच्या इतिहासात यापूर्वी केवळ काँग्रेसचे दिवंगत नेते प्रकाशबापू पाटील यांनाच हॅटट्रिक नोंदविता आली. त्यानंतर कोणालाही हा पराक्रम करता आला नाही.
कोणाला किती मते मिळाली (२४व्या फेरीअखेर)
- विशाल पाटील ५,६५,७९९
- संजय पाटील ४,६६,७२६
- चंद्रहार पाटील ५९,७९२