चर्चेतील व्यक्तीशी थेट संवादशासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या विस्तारिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच इमारतीचा ताबा मिळेल- डॉ. पल्लवी सापळेसचिन लाड।गोरगरीब रुग्णांचा आधार म्हणून सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचा पश्चिम महाराष्टÑात लौकिक आहे. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना चांगल्याप्रकारे सेवा दिली जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या साडेसहा लाखांवर गेली आहे.
प्रश्न : रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या विस्तारिकरणाचा प्रश्न गेल्या नऊ वर्षांपासून चर्चेत आहे. अजूनही काम पूर्ण झालेले नाही?उत्तर : अधिष्ठाता पदाची सूत्रे हाती घेऊन अडीच वर्षे होऊन गेली आहेत. रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न केले आहेत. २००९ मध्ये बाह्यरुग्ण विभागाच्या विस्तारिकरणास मंजुरी मिळाली. शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्ग केला. या विभागाने चार वर्षांपूर्वी काम सुरु केले. सध्याच्या स्थितीला ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक महिन्याला आम्ही त्याचा आढावा घेतो. येत्या काही दिवसात काम पूर्ण होऊन बांधकाम विभाग ही इमारत आमच्याकडे हस्तांतर करतील, अशी अपेक्षा आहे.
प्रश्न : रुग्णांंच्या नातेवाईकांना औषधे बाहेरुन खरेदीसाठी आणण्याची चिठ्ठी दिली जाते? हे कधी थांबणार?उत्तर : पिवळे रेशनकार्ड असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. ज्येष्ठ नागरिकांनाही मोफत सुविधा दिल्या जातात. औषधांसाठी शासनाकडे निधी वाढवून मिळाला आहे. सर्व प्रकारची औषधे उपलब्ध असतात; पण वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे काही वेळेला औषधे संपतात. त्यावेळी बाहेरुन औषधे आणण्यास सांगितले जाते. पण रुग्णांची गैरसोय होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
प्रश्न : रुग्णांची संख्या वाढण्याचे काय कारण?उत्तर : गेल्या वर्षभरात साडेसहा लाखांहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. यावरुन खासगीपेक्षा शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचा कल वाढला आहे. रुग्णांना सर्वप्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. मिरजेत स्वतंत्र रक्तपेढी तसेच भाजलेल्या रूग्णांसाठी विभाग सुरु केला आहे. दोन डायलेसीस यंत्रे बसविली आहेत. मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. बाह्यरुग्ण विभागात दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण येतात. आॅनलाईन काम सुरु आहे. मिरज रुग्णालय पेपरलेस केले आहे.वरिष्ठांना लेखी खुलासा सादर केला आहे...बाह्यरुग्ण विभागाचे अजून काम पूर्ण झाले नसताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याहस्ते कोनशिला घेऊन अधिष्ठातांनी तासगाव येथे उद्घाटन करुन घेतले, अशी बातमी मला प्रसारमाध्यमातूनच समजली. यासंदर्भात मला माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारणा केली. त्यांनी लेखी खुलासा देण्याची मागणी केली. हा खुलासा मी वरिष्ठांना सादर केला आहे. या विषयावर मला अधिक बोलायचे नाही.‘सिव्हिल’चा विस्तार वाढतच राहणार...सांगली आणि मिरज या दोन्ही शासकीय रुग्णालयात सोयी-सुविधा निर्माण करण्यात कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केला जात नाही. बाह्यरुग्ण विभाग लवकरच रुग्णांच्या सेवेत येईल. याशिवाय सांगलीत जन्मजात मुलांना काही आजार असेल, तर त्यांच्यावर उपचारासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला जाणार आहे. या विभागाच्या इमारतीचे काम सुरु झाले आहे. मुले दिव्यांग होऊ नयेत म्हणून हा विभाग सुरु करण्याचा हेतू आहे. तसेच शंभर खाटांचे आई व लहान मुलांसाठी विभाग सुरु करणार आहे.