विटा : राज्यातील पुलांची देखभाल-दुरूस्ती व उभारणीसाठी स्वतंत्र विभाग केला असून, त्यासाठी सहा विभागात सहा शाखा सुरू होत आहेत. राज्यातील सर्वच पुलांचे वर्षातून दोनवेळा सर्वेक्षण करणे हे त्या विभागाचे काम आहे. ज्या पुलांची दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या पुलांची दुरुस्ती करण्यात येईल. जे वाहतुकीसाठी योग्य नाहीत, त्या पुलांची नव्याने उभारणी करण्यात येईल, असे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. येथील विटा-कऱ्हाड रस्त्याच्या रूंदीकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे, प्रांताधिकारी अश्विनी जिरगे, तहसीलदार कल्पना ढवळे, मकरंद देशपांडे उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सावित्री नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले होते, त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. राज्यात धोकादायक लहान-मोठे मिळून २० हजारहून अधिक पूल आहेत. यामधील काही पूल धोकादायक आहेत, याबाबत दुमत नाही. मात्र हे सर्वच पूल एकावेळी पाडून नव्याने बांधणे शक्य नाही. त्यासाठी मनुष्यबळही उपलब्ध नाही. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात राज्यातील धोकादायक पुलांवर रिफ्लेक्टर लावण्यात येणार असून, आठ तासांच्या शिफ्टमध्ये तीन पहारेकऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाबाबतीत आॅगस्ट महिन्यात पुणे येथे विभागातील आमदार व अधिकाऱ्यांची बैठक झाली असून, राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच मार्गी लागेल. विजापूर-गुहागर मार्गावरील कऱ्हाड ते विटा मार्गावरील होणाऱ्या कामाबाबत आमदार अनिल बाबर पाठपुरावा करीत आहेत. त्याबाबत लवकरच तोडगा निघेल, असेही ते म्हणाले. यावेळी अॅड. विनोद गोसावी, राजाराम गरुड, सूतगिरणीचे अध्यक्ष अमोल बाबर, माजी उपसभापती सुहास बाबर, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक दिलीप आमणे, बाळासाहेब लकडे, प्रकाश बागल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धोंडीराम रास्कर, कृष्णदेव शिंदे, गणपतराव भोसले, दिलीप कीर्दत, राजू जाधव, अभिजित कदम, राजू मुल्ला, समीर कदम, सुधीर जाधव यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)मराठा क्रांती मोर्चा : सरकार सकारात्मक
पुलांच्या देखभालीसाठी स्वतंत्र विभाग
By admin | Published: September 19, 2016 11:42 PM