गव्हाण : वज्रचौंडे (ता. तासगाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अपक्ष निवडून आलेल्या संध्या सचिनकुमार पाटील यांची तर उपसरपंचपदी धनाजी बापू यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. देसाई यांनी काम पाहिले.
वज्रचौंडे ग्रामपंचायतीत एकूण सदस्य संख्या ७ आहे. सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला, असे आरक्षण होते. दोन सदस्य बिनविरोध झाले होते. बाकीच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन, तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. सातपैकी चार सदस्य राष्ट्रवादीचे होते. राष्ट्रवादीचाच सरपंच होणार, अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडली. त्यामुळे या ठिकाणी अपक्ष विजयी झालेल्या संध्या पाटील सरपंच झाल्या. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. संध्या पाटील म्हणाल्या, स्थापनेपासून ६० वर्षांपासूनची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहे. सर्व जाती-धर्मातील व्यक्तींना एकत्रित घेऊन गावचा सर्वांगीण विकास करू.
यावेळी ग्रामसेवक बी. के. वाघमोडे, डॉ. सचिन पाटील, गौरीहर यादव, संभाजी यादव, महादेव यादव, गणेश पाटील, दिलीप यादव, बाळासोा पाटील, शंकर कुंभार उपस्थित होते.
चौकट
उच्चशिक्षित सरपंच
वज्रचौंडे ग्रामपंचायतीसाठी संध्या पाटील यांच्या माध्यमातून उच्चशिक्षित सरपंच मिळाल्या आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए., बी.एड. झाले आहे. त्यांच्याकडून गावाच्या विकासाची ग्रामस्थांकडून अपेक्षा आहेत. गावचे माजी पोलीस पाटील निवृत्ती पाटील यांच्या त्या नातसून असून, पदवीधर शिक्षकांचे नेते गजानन पाटील यांच्या त्या सूनबाई आहेत.