शिरटे : जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त सकारात्मक विचार जोपासणे आवश्यक आहे. नासासह जगातील अनेक देशांत भारतातील युवक संशोधन कार्यात अग्रस्थानी आहेत. त्यामुळे जगाच्या ज्ञानदानात भारताचीच मक्तेदारी आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नसल्याचे मत इस्लामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी व्यक्त केले.
भवानीनगर (ता. वाळवा) येथे जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने आयोजित कवयित्री शैला सायनाकर स्मृती व्याख्यानमालेत ‘आजची तरुणाई आणि पोलिसांची भूमिका’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाजीराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
पिंगळे म्हणाले, धावपळीच्या युगात पैशाच्या मागे लागल्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊन संवाद कमी झाला आहे. नकारात्मकता वाढत असून सकारात्मक विचार जोपासणे गरजेचे आहे. उगवत्याला नमस्कार करताना मावळत्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी तरुणांपुढे आदर्श व्यक्तींची चरित्रे ठेवली पाहिजेत.
यावेळी रमेश पाटील, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ सावंत, अशोक गोडसे, नीता पाटील, जयश्री पवार, मंडळाचे अध्यक्ष सुहास सावंत, उपाध्यक्षा वनीता मोहिते उपस्थित होत्या.
प्रास्ताविक प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी केले. मकरंद राजहंस यांनी स्वागत केले. स्वाती मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती मेहता यांनी आभार मानले.
चौकट
सोशल मीडिया ठरला माणुसकीचा झरा
मार्च महिन्यात कोरोनाने गोरगरिबांचे अत्यंत हाल झाले. एकवेळचे जेवण मिळणे मुश्किल होते. त्यावेळी सोशल मीडियातून केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ६७ दिवस १५०० लोकांना दोन वेळचे जेवण दिले. २००० शालेय मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. यासाठी सर्व स्तरातून ९२ लाख रुपये जमा झाले. त्यामुळे संकटकाळात सोशल मीडिया हा माणुसकीचा झरा बनल्याचे पिंगळे यांनी सांगितले.
फोटो : ११०२२०२१-आयएसएलएम-कृष्णात पिंगळे