सहदेव खोतपुनवत : शिराळा तालुक्यात सध्या सुरू असलेल्या भाताच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून संकरित बियाणांनाच पसंती मिळत आहे. जुन्या काळातील भाताची देशी बियाणे नामशेष होत चालली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.तालुक्यात भाताच्या धुळवाफेवरील पेरणीसाठी शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानात गर्दी होत आहे. सध्या शंभरावर जातींच्या भाताची बियाणे उपलब्ध आहेत. प्रामुख्याने कोमल, रत्ना-१, रत्नागिरी- २४ सोनम, इंद्रायणी, भोगावती, सुप्रीम सोना, जया, तृप्ती, कावेरी, राशी पूनम, वायएसआर आदी बियाणांना शेतकरी पसंती देत आहेत.पिशवीबंद असलेल्या या बियाणांचा दर प्रति किलो ५० रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यंत आहे. ही संकरित बियाणे तीन ते चार महिन्यात उत्पन्न देणारी आहेत. शेतीची प्रत बघून शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करावी लागत आहे.दुसरीकडे तालुक्यात पूर्वीच्या काळात असलेली शिराळा मोठे, मासाड, काळी कंगनी, शिरगाव मोठे, चिरमुरे, जोधगं, फोंडा, टायचन, जिरेसाळी आदी गावठी बियाणे नामशेष झाली आहेत. ही बियाणे शेतकरी घरगुती पद्धतीने जतन करीत असत व पेरणीच्या हंगामात एकमेकांना देत असत.
भाताच्या जुन्या बियाणांचे जतन करताना खूप कष्ट करावे लागायचे. प्रत्येकाच्या घरी ही बियाणे असायची. चवीच्या बाबतीत ती सरस होती. घरोघरी बियाणे असल्यामुळे त्यावर खर्च करावा लागत नसे. - शामराव खवरे, शेतकरी खवरेवाडी..