श्रीनिवास नागे ।दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सांगलीचे ऋणानुबंध सत्तरच्या दशकात जुळले आणि अनेक वर्षे कायम राहिले. काँग्रेस पक्ष आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळे इंदिराजींचे सांगलीशी दृढ बंध निर्माण झाले होते. इंदिराजींच्या जयंतीच्या निमित्ताने या आठवणींना दिलेला उजाळा...
१९६९ मध्ये देशभर काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. इंदिरा गांधीपुरस्कृत इंडिकेट काँग्रेस आणि श्रेष्ठींची म्हणजे संघटना काँग्रेसची सिंडीकेट अशी फूट पडली. त्यावेळी वसंतदादा प्रदेशाध्यक्ष होते. १९७१ ला संघटना काँग्रेस, जनसंघ आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांनी आघाडी तयार करून ‘इंदिरा हटाव’चा नारा दिला. त्यावेळी दादांनी इंदिरा गांधींच्या पाठीशी राहण्याची ठाम भूमिका घेतली. १९७२ मध्ये वसंतदादा प्रदेशाध्यक्ष असताना इंदिरा गांधींनीच त्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी सूचना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना केल्याने दादा पाटबंधारेमंत्री झाले.
पुढे आणीबाणीनंतर १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाली. त्यावेळी वसंतदादांनी इंदिरा गांधींची भेट घेऊन राज्यातील नेतृत्व बदलण्याचे सुचविले. तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी पक्षांतर्गत निवडणूक झाली. त्यात दादा निवडून येऊन मुख्यमंत्री बनले. १९७८च्या दरम्यान काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली. इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी (रेड्डी-यशवंतराव चव्हाण) काँग्रेस असे दोन भाग झाले. हा वाद मिटवण्यासाठी दादांनी प्रयत्न केले. १९७९ मध्ये समाजवादी काँग्रेसमधील दादांसह शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, स. का. पाटील, नरेंद्र तिडके हे नेते पुन्हा इंदिरा काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत दादा सांगलीतून खासदार बनले.
वसंतदादांचे संगठन कौशल्य पाहून इंदिरा गांधींनी त्यांना १९८० मध्ये केंद्रीय मंत्रिपदाची आॅफर दिली होती. मात्र दादांनी ती नाकारली. अखेर इंदिराजींनी त्यांच्यावर २० आॅगस्ट १९८० रोजी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली. १९८३ च्या सुरुवातीस दादा पुन्हा राज्यात परतले. ३१ जानेवारीस काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक झाली. त्यात दादा आणि यशवंतराव मोहिते यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी लढत झाली. दादा निवडून आले. त्यांच्या त्या विजयामागेही इंदिरा गांधींच्या ‘सदिच्छा’ होत्या...काँग्रेस भवनचे उदघाटनतत्कालीन दक्षिण सातारा म्हणजे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस भवनचे उद्घाटन तत्कालीन अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांच्याहस्ते १३ आॅक्टोबर १९५९ रोजी झाले होते. त्याची कोनशीला सांगलीतील या काँग्रेस भवनात आहे.दादांच्या विरोधात प्रचारसभा१९७८ मध्ये महाअधिवेशन बोलावण्यावरून काँग्रेसमध्ये फूट पडली. फेब्रुवारीत निवडणुका जाहीर झाल्या. इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी कॉँग्रेस (रेड्डी-यशवंतराव चव्हाण) अशी पक्षाची विभागणी झाली. दादा समाजवादी काँग्रेसमध्ये गेले. निवडणुकीत दादांच्या विरोधात इंदिरा काँग्रेसमधून थांबलेल्या युसूफ शेख यांच्या प्रचारासाठी इंदिरा गांधींनी स्वत: सांगलीत येऊन सभा घेतली होती.शालिनीतार्इंसाठी विराट सभामे १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी वसंतदादा खासदार असल्याने शालिनीताई पाटील यांना सांगलीतून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या प्रचारासाठी १४ मे १९८० रोजी इंदिरा गांधी यांची सांगलीत विराट सभा झाली होती.आष्टा नगरपालिकेस भेटआष्टा नगरपालिकेसही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भेट दिली होती. त्यांच्याहस्ते घरकूल योजनेचे उद्घाटन झाले होते. यावेळी विलासराव शिंदे, विजयमाला वग्याणी, मंदाकिनी रूकडे, गणपतराव कासार उपस्थित होते.आठवण पैलवानांचीवसंतदादा पाटील पाटबंधारेमंत्री असताना महाराष्टÑातील पैलवानांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटण्यास दिल्लीला गेले. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या बंगल्याच्या हिरवळीवर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा आणि हिंदकेसरी मारुती माने, गणपतराव आंदळकर, दादू चौगुले आदींनी छायाचित्र काढून घेतले होते.