लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज तालुक्यातील खंडेराजुरी ते गवळेवाडीदरम्यान म्हैशाळ उपसा सिंचन प्रकल्पाच्या जलवाहिन्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या चाैकशीसाठी राष्ट्र विकास सेनेतर्फे खोदलेल्या चरीत बसून ठिय्या आंदोलन केले.
म्हैशाळ योजनेअंतर्गत खंडेराजुरी ब्रम्हनाथ तलाव ते गवळीवाडीपर्यंत बंदिस्त पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार आहे. सुमारे अडीच कोटी खर्चाच्या या जलवाहिन्या बसविल्यानंतर चाचणीवेळी गळती सुरू आहे. बुजविलेल्या जलवाहिन्या पुन्हा खोदून एमसील लावून गळती काढण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या समोरच सुरू आहे. तात्पुरती मलमपट्टी करूनही गळती सुरूच आहे. राष्ट्र विकास सेनेतर्फे या नित्कृष्ट कामाच्या चाैकशीची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्र विकास सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जलवाहिनीसाठी खोदलेल्या चरीत बसून आरती करून ठिय्या आंदोलन सुरू केले.
अधिकारी कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे राष्ट्र विकास सेना युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद मोरे, गवळीवाडीचे शेतकरी आंदोलनात सहभागी होते.