गडचिरोलीसारखा नक्षलग्रस्त भागात नोकरी म्हणजे अधिकाऱ्यांसाठी दिव्यच. त्यातही पोलिसांसाठी या भागातील सेवा आव्हान असते. मात्र एकदा अधीक्षक म्हणून काम केले असतानाही पुन्हा याच भागात स्वत:हून पोस्टिंग घेणारे आणि त्या भागात प्रभावी काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संदीप पाटील. मूळचे वाळवा तालुक्यातील येलूर येथील पाटील सध्या गडचिरोली येथे उपमहानिरीक्षक आहेत.
खाकी वर्दीतील माणुसकी जपणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सातारा सैनिक स्कूलमधील शिक्षणानंतर एनडीएमध्ये शिकलेल्या पाटील यांनी २००६ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. ते आयपीएसपदी झाले. सुरुवातीला चंद्रपूर, खामगाव व परभणी येथे काम केल्यानंतर २०१४ मध्ये गडचिरोलीत सूत्रे स्वीकारली. त्यानंतर सातारा व पुणे ग्रामीण येथे अधीक्षकपदी काम केले. आता मिळालेल्या पदोन्नतीमध्ये त्यांनी स्वत:हून गडचिरोलीची पोस्टिंग मागून घेतली.
नक्षलग्रस्त भागात काम करताना त्यांच्या कार्यकालात १०४ पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती. त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी देशातील पहिली कॉलनीही बांधली. त्यांच्या कार्यकालात प्रथमच विधानसभा, लोकसभा व इतर निवडणुका शांततेत पार पडल्या होत्या.
गडचिरोलीहून साताऱ्यात बदली होऊन आलेल्या पाटील यांनी भेटीला येणाऱ्यांसाठी ‘बुके नको, बुक आणा’ हा उपक्रम राबविला होता. त्यातून जमा झालेली सर्व पुस्तके त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सुरू केलेल्या ग्रंथालयासाठी पाठविली होती. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी, प्रगतीसाठी त्यांनी विशेष उपक्रम राबविले आहेत.
शांत व संयमी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पाटील यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.