सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासाठी एकीकडे मी ताकद पणाला लावली असताना, एका नेत्याने योजना बंदच रहावी म्हणून अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले होते. अशाप्रकारच्या राजकारणाची सांगलीची परंपरा नाही, असे मत खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
ते म्हणाले की, माझ्या प्रयत्नावेळी जिल्ह्यातील भाजपसहीत कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या आमदारांनीही योजना सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले. आ. सुमनताई पाटीलही या प्रयत्नांना पाठबळ देत होत्या. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्यामुळे यात राजकारण आणणे चुकीचे होते, मात्र एका राजकीय नेत्याने माझे प्रयत्न यशस्वी होऊ नयेत म्हणून प्रयत्न चालविले होते. त्यांची ही कृष्णकृत्ये अखेर माझ्यासमोर आली. वास्तविक इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण कधीच सांगली जिल्ह्यात झाले नव्हते. आम्हीसुद्धा राजकारणात असल्या गोष्टी कधीच केल्या नाहीत. चुकीची परंपरा कोणीतरी पाडू पहात आहे. परंपरेला हा डाग आहे. निवडणुकीपुरते राजकारण मर्यादित ठेवून लोकांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.ते म्हणाले की, म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मदत केली. एकवेळ माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता, मात्र माझी नाराजी पक्ष किंवा कोणत्या नेत्यावर नव्हती. जलदगतीने निर्णय होत नव्हता म्हणून माझी नाराजीची प्रतिक्रिया उमटली होती. सध्यस्थितीत कोणतीही नाराजी नाही. योजनेच्या थकीत वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढे शेतकºयांना अत्यंत माफक दरातील बिल भरणे सहज शक्य होईल. त्यामुळे शासनाचा निर्णयावर मी समाधानी आहे.राजीनाम्यामागे राजकारण नव्हते!ज्या जनतेने मला निवडून दिले, त्यांच्यासाठी माझे प्रयत्न यशस्वी होत नसतील तर, पदावर रहायचे कशाला, असा विचार करून नाराजीतून राजीनामा दिला होता. मात्र यामागे माझे कोणतेही राजकारण नव्हते. स्टंटबाजी करून मोठे व्हायचे नाही. लोकांसाठी काही तरी भरीव कार्य करायचे आहे, असे संजयकाका म्हणाले.नेता कोण?योजना बंद रहावी म्हणून प्रयत्न करणारा तो नेता कोण, असा प्रश्न विचारल्यानंतर संजयकाका पाटील म्हणाले की, त्या गोष्टीतून पुन्हा राजकारण होऊ नये, असे मला वाटते. त्यामुळे कोणाचे नाव घेणार नाही. संजयकाकांचा निशाणा पक्षातीलच एका नेत्यावर असावा, अशी चर्चा आता रंगली आहे.