जागतिक मातृदिन आणि कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथीचे औचित्य साधून पर्यावरण समृद्धी मंचतर्फे येथे ‘पर्यावरणतज्ज्ञ आपल्या भेटीला’ उपक्रम राबविण्यात आला. बीड येथील प्रा. मोहन परजणे यांनी ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन केले.
शिराळा तालुक्याचा नैसर्गिक वारसा जपण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती व्हावी, लोकसहभाग वाढावा. त्यासाठी कृतिशील वारसदार व्हा, असे प्रतिपादन पर्यावरणप्रेमींनी केले.
ते म्हणाले, पर्यावरण क्षेत्रात अनेक संस्था, संघटना कार्यरत आहेत, तरीही स्थानिक पातळीवर संघटनात्मक भरीव काम होण्याची आवश्यकता आहे. पुढच्या पिढीला आनंदी जगण्यासाठी आताच प्रयत्न केले, तर पुढील धोका टळू शकेल. गावपातळीवर पर्यावरण चळवळ समृद्ध झाली, तरच
जागतिक पर्यावरण चळवळ गतिमान होईल.
पाणीटंचाई कमी करण्यासाठी गावोगावी पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाली पाहिजेत. शेतकऱ्यांनी स्थानिक प्रजातीच्या बियाणांना प्राधान्य द्यावे.
गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर म्हणाले, पशुपक्ष्यांचे अधिवास मानवाने नष्ट केले आहेत. त्यांच्या अन्नसाखळीत बिघाड निर्माण झाला आहे. ती अन्नसाखळी पूर्ववत करणे गरजेचे आहे.
प्रकाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. सचिन करमाळे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी, सूत्रसंचालन जितेंद्र लोकरे यांनी केले. आभार महादेव हवालदार यांनी मानले. यावेळी गंगाराम पाटील, स्वाती जांभळी, सुप्रिया घोरपडे, मोहन पाटील, करुणा मोहिते, योगिता काळे, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.