कवठेमंहाकाळ : रायवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे माजी उपसरपंच दयानंद राजाराम साबळे यांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. रविवार दि. ३० जानेवारी राेजी ही घटना घडली. याप्रकरणी राजाराम नारायण माने, महेश मधुकर साळुंखे व दीपक मधुकर साळुंखे (रा. तिघेही रायवाडी) व अन्य दाेन अनाेळखींविराेधात कवठेमहांकाळ पाेलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी मुख्य संशयित राजाराम माने याला ताब्यात घेतले असून अन्य चाैघे हल्लेखाेर फरार आहेत.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रायवाडीचे माजी उपसरपंच दयानंद साबळे रविवारी त्यांच्या भावकीतील वाद मिटवत थांबले होते. या वेळी राजाराम माने हा महेश साळुंखे, दीपक साळुंखे व अन्य दाेघांसह तेथे आला. साबळे यांना जातिवाचक शिवीगाळ करीत त्यांच्या कानशिलात लगावली. ‘तुझी आणि तुझ्या समाजाची घरे पेटवून टाकतो. तुला आज ठेवत नाही.’ अशी धमकी देत जबरदस्तीने साबळे यांना माेटारीत घातले. माेटार प्रचंड वेगाने तिसंगीत सिद्धनाथ डोंगराच्या पायथ्याशी आणली. तेथे साबळे यांना पुन्हा जातिवाचक शिवीगाळ करत हातावर, पायावर अमानुषपणे स्टंपने मारहाण केली. मारहाणीत साबळे गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी साबळे यांनी कवठेमंहाकाळ पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित राजाराम माने, दीपक साळुंखे ,महेश साळुंखे यांच्यासह अनोळखी दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. प्रमुख संशयित राजाराम माने यास ताब्यात घेतले असून अन्य चौघे फरार आहेत.
गावात बंदोबस्त
दरम्यान, उपविभागीय पाेलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. गावामध्ये तणावाचे वातावरण असून पाेलिसांनी माेठा बंदाेबस्त तैनात केला आहे.