इस्लामपूर : येथील आधार हेल्थ केअर सेंटरमध्ये कोविड उपचार केंद्र चालवणारा डॉ. योगेश वाठारकर सध्या पोलिसांत अटकेत आहे. त्यामुळे या रुग्णालयात कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मात्र काही रुग्ण स्वत:हून उपचारासाठी अन्य रुग्णालयांत दाखल झाले आहेत.
आधारमध्ये कोविडच्या केंद्रात २३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने या रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घेण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नरसिंह देशमुख यांनी तेथे एमडी दर्जाच्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णांसह सामान्य वॉर्डामध्ये असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू ठेवले जाणार आहेत.
दरम्यान, काही रुग्णांनी नातेवाइकांच्या मदतीने स्वत:च्या जबाबदारीवर अन्य रुग्णालयात दाखल होण्यास पसंती दिली आहे. २३ पैकी काही रुग्ण इतर रुग्णालयात दाखल झाले आहेत.