दत्ता पाटील तासगाव : तासगाव शहरात नगरपालिकेच्या वतीने सव्वा सहा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले, कस्तुरबा गांधी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तात्काळ सुरू व्हावे यासाठी खासदार संजय पाटील सरसावले आहेत. हॉस्पिटल साठी आवश्यक असणारे डॉक्टर आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून, गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत उपचाराची सोय व्हावी. यासाठी लवकरच मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी खासदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या बैठकीनंतर रुग्णालय सुरू होऊ शकते. राज्य शासनाकडून निधी मिळवून सहा कोटी तीस लाख रुपये खर्चून तासगाव नगरपालिकेच्यावतीने कस्तुरबा गांधी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. शंभर बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभा राहिले. एक वर्षांपूर्वी या हॉस्पिटलचे लोकार्पण झाले. मात्र वर्षभरानंतर देखील हे हॉस्पिटल धुळखात पडून होते. याबाबत 'लोकमत' मधून आवाज उठवण्यात आला होता. त्याची दखल घेत तासगावातील नेत्यांनी हालचाली गतिमान करून रुग्णालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयासाठी तज्ञ डॉक्टर आणि कुशल मनुष्यबळ आणायचे कोठून? त्यांच्या पगाराचा आणि औषधोपचारांचा खर्च भागवायचा कसा? हा प्रश्न अनुत्तरीतच होता. रुग्णालयाची इमारत तयार झाल्यानंतर हे रुग्णालय खाजगी संस्थेमार्फत चालवायचे की नगरपालिकेने स्वतः रुग्णालय चालवायचे? याबाबत चर्चा झाली. मात्र या दोन्ही गोष्टी शक्य नसल्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीत यापूर्वी असलेल्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकामार्फत रुग्णालय चालवायचे किंवा मिरज मेडिकल मिरज वैद्यकीय महाविद्यालयाशी हे रुग्णालय संलग्न करून चालवायचे याबाबत चर्चा होत होती. मात्र हे रुग्णालय चालवण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळवणे आणि औषध उपचारांसह कार्यरत कर्मचारी डॉक्टर यांचा खर्च भागवणे या सर्व प्रक्रिया शासन पातळीवरूनच निश्चित होणार आहेत शासन पातळीवरूनच हे रुग्णालय चालवण्याबाबत निर्णय होऊ शकतो. धोरणात्मक निर्णय शक्यशासन पातळीवरती उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, नगरपालिका आणि जिल्हाप्रशासनाच्या मार्फत संयुक्त बैठक घेऊन या बैठकीत रुग्णालय सुरू करण्यासाठी सर्वसमावेशक निर्णय व्हावा, यासाठी खासदार पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच याबाबत बैठक होऊन रुग्णालय सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी होईल. अशी खात्री खासदार पाटील यांनी दिली आहे
तासगावात शहरासह तालुक्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत उपचाराची सोय व्हावी, याच उद्देशाने तासगाव नगरपालिकेच्या वतीने सव्वा सहा कोटी रुपये खर्चून प्रशस्त रुग्णालय उभारण्यात आले आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत रुग्णालय सुरू करण्याबाबत योग्य तो तोडगा निघेल. - खासदार संजय पाटील.