कुपवाड : शहरातील प्रभाग एकमधील गणेश भक्तांची सोय व्हावी, या उद्देशाने जमीर रंगरेज फ्रेंड सर्कलतर्फे आंबा चौकात आकर्षक गणेश विसर्जन कुंड व मूर्तिदान केंद्र उभारण्यात आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी राबविलेला जमीर रंगरेज फ्रेंड सर्कलचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव संकल्पनेमुळे जमीर रंगरेज फ्रेंड सर्कलतर्फे या कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था केली आहे. महापालिका, लालबाग गणेश मंडळ व जमीर रंगरेज फ्रेंड सर्कलच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादीचे युवा नेते जमीर रंगरेज, मुश्ताकअली रंगरेज व नगरसेविका रईसा रंगरेज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग एकमधील नागरिकांच्या सोयीसाठी आंबा चौक या ठिकाणी आकर्षक रंगरंगोटी, विद्युत रोषणाईने सजविलेले सीसीटीव्ही सुविधांयुक्त असे कृत्रिम विसर्जन केंद्र, निर्माल्य कुंड व मूर्तिदान केंद्र उभारले आहे. याच केंद्राच्या माध्यमातून गेल्यावर्षी १६०० मूर्ती विसर्जित, तर १३० मूर्ती दान झाल्याचेही जमीर रंगरेज यांनी सांगितले.
या केंद्रावर गणेशमूर्ती विसर्जन अथवा दान करणाऱ्या भक्तांना सहभाग प्रमाणपत्रही दिले जाते. त्यामुळे या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जित करण्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. हा उपक्रम पाहण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते. जमीर रंगरेज यांनी स्वागत केले. स्वच्छतेसाठी मनपा आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे व कर्मचारी विशेष कामगिरी बजावत आहेत. संयोजन जमीर रंगरेज, सुरेश खांडेकर, केदार गायकवाड, दिलावर मुजावर, संदीप माने, प्रदीप माने, बबन होवाळ करीत आहेत.
फोटो : १२ कुपवाड २
ओळ : कुपवाडमध्ये आंबा चौकात जमीर रंगरेज फ्रेंड सर्कलने बनविलेले आकर्षक गणेश विसर्जन व मूर्तिदान केंद्र.