करगणी : आटपाडी तालुक्यातील उन्नती महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा अभियंता अनिता पाटील यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी अशिक्षित महिलांच्या हाती पाटी-पेन्सिल देत त्यांना शिक्षित करण्याचा विडा उचलला आहे. त्यांनी शिकवणी वर्ग सुरू केले आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अनिता पाटील यांनी अशिक्षित महिला शिक्षित करण्याचा संकल्प केला आहे. अनिता पाटील म्हणाल्या, खरे तर स्त्री ही जगतजननी आहे. तिच्यासाठी एक दिवसच काय, पण संपूर्ण आयुष्य हा एक प्रवासच असतो. त्यात ती अनेक रूपाने आपले कर्तव्य पार पाडत असते. अनेक महिलांना परिस्थितीने शिक्षणापासून वंचित राहावे लागते. काहींना मुळाक्षरांची ओळखसुद्धा झाली नाही. अशा महिलांसाठीच आटपाडीच्या समाजसेविका अनिता पाटील यांनी पुढाकार घेत त्यांना शिक्षित करण्याचा निश्चय केला आहे. शिक्षिका अर्चना काटे यांच्या साथीने महिला शिक्षणवर्ग सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून दररोज सायंकाळी चार ते पाच या वेळेत आटपाडीतील विद्यानगर येथे शिकवणी वर्ग सुरू आहेत. पहिल्याच दिवशी २५ महिलांनी सहभागी होत मुळाक्षरे गिरवण्यास सुरुवात केली आहे. अनिता पाटील यांनी स्वतः विद्यार्थी आणि महिलांसाठी पाटी, पेन्सिल देत स्वागत करून दीड महिन्यात लिहिता-वाचण्यासाठी तयार करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.