सांगली : भिलवडी (ता. पलूस) येथील आशासेविका भाग्यश्री माळी या सोमवारी औदुंबर येथे जात असताना अपघात झाल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांना खासगी गाडीतून प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी येथे उपचारासाठी दाखल केले. पण तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार न केल्याबद्दल आरोग्य कर्मचारी संघटनेने या घटनेचा निषेध केला.
भाग्यश्री माळी सेवा बजावण्यासाठी औदुंबर येथे जात होत्या. यावेळी अचानक अपघात होऊन त्यांच्या डोक्याला जबर मारहाण झाली. तेथील नागरिकांनी खासगी वाहनातून भिलवडी आरोग्य केंद्रात दाखल केले; पण तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला. तेथील कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी आल्यावर उपचार करू अशी उत्तरे दिली. वैद्यकीय अधिकारी तासाभराने आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर प्राथमिक उपचार सुरू केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी संबंधित डॉक्टरांनी सांगलीतील एका खासगी रुग्णालयाची चिठ्ठी दिली. पुढील उपचारासाठी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना योद्धा आशासेविका माळी यांना दिली नाही. कोरोनात अत्यल्प मानधनावर राबणाऱ्या आशा सेविकांची गैरसोय केल्याबद्दल जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निषेध केला आहे, अशी माहिती आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी दिली.