सांगली : शहरातील संजयनगर परिसरात झालेल्या खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. राजेंद्र रामचंद्र नाईक (रा. जुना कुपवाड रोड, शिंदे मळा, सांगली) असे मृताचे नाव आहे. या खुनी हल्लाप्रकरणी यापूर्वीच दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.संशयित सत्यजित उर्फ गबऱ्या नामदेव माने (वय ३०, रा. रामरहिम कॉलनी, सांगली) आणि करण विजय परदेशी (वय १९, रा. जगदाळे प्लॉट, संजयनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला होता. हल्ल्यात जखमी झालेला नाईक याची संजयनगर येथील रेल्वे पुलाजवळ चहाची टपरी होती. रविवारी सायंकाळी संशयित सत्यजित माने व करण परदेशी त्याच्याकडे आले व त्यांच्यात पैशांवरून जोरदार वादावादी झाली. हा वाद वाढल्यानंतर संशयितांनी धारदार शस्त्राने नाईक याच्यावर हल्ला केला होता. यात पायाला दुखापत झाल्याने नाईकची प्रकृती चिंताजनक बनली होती. गंभीर असलेल्या नाईकचा बुधवारी सकाळी उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नाईक याच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ रुग्णालयासमोरील वातावरण तणावपूर्ण बनले होते. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना शांततेचे आवाहन केले होते. अखेर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
संशयितांनीच नेले रुग्णालयातशस्त्राच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नाईक याला दोघा संशयितांनीच रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू करावेत, यासाठी फरशी लागल्याने तो जखमी झाल्याचेही त्यांंनी तिथे सांगितले होते. सध्या दोघेही अटकेत आहेत.