बोरगाव : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील अपघातात जखमी झालेले १७ मराठा बटालियनचे जवान शेखर बाळासाहेब कदम (वय २७) यांचे सोमवार, दि. २० राेजी ६ वाजता पुण्यातील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता मसुचीवाडी येथे लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शेखर कदम हे गुजरातमधील भूज येथे सैन्य दलात १७ मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. एक महिन्याच्या सुटीवर ते गावी आले होते. त्यांच्याच बटालियनमधील तांबवे (ता. वाळवा) येथील मित्र प्रथमेश लोखंडे यांच्यासाेबत वाघवाडीकडून इस्लामपूरकडे जाताना अज्ञात वाहनाने त्यांंना धडक दिली हाेती. अपघातात प्रथमेश लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला हाेता, तर शेखर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुणे येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. साेमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच मसुचीवाडी व इस्लामपूर परिसरात शोककळा पसरली.मंगळवारी सायंकाळी मृतदेह मसुचीवाडी येथे आल्यानंतर गावातून अंत्ययात्रा काढून लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे, मंडळ अधिकारी संभाजी हंगे, सुभेदार नाईक शेखपीरा, जितेंद्र पाटील, माणिक शा. पाटील, धैर्यशील पाटील, सर्जेराव कदम, शांताराम कदम, माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
गावात तीन दिवस दुखवटादोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना ८ महिन्यांचा मुलगा आहे. चार वर्षांपूर्वी पितृछत्र हरपल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. लहान भाऊ श्रीधर हाही त्यांच्या प्रोत्साहनामुळे मागील वर्षी सैन्य दलात भरती झाला. शेखर यांच्या मृत्यूमुळे मसुचीवाडी गावाने उद्यापासून पुढील तीन दिवस दुखवटा पाळण्याचा, तसेच गुढीपाडवा साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.