प्रताप महाडिक -- कडेगाव -तालुक्यातील १७ गावांचा समावेश अद्याप दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत झालेला नाही. या गावांची खरीप हंगामातील पीक उत्पादनाची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. दुष्काळग्रस्तांच्या सर्व निकषास पात्र असतानाही या गावांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी करत आहेत.कडेगाव तालुक्यातील सोनहिरा खोऱ्यातील सोनसळ, सोनकिरे, शिरसगाव, पाडळी, आसद, मोहित्यांचे वडगाव, देवराष्ट्रे, रामापूर, कुंभारगाव, शिरगाव, अंबक, चिंचणी या १२ गावांसह वांगी, शेळकबाव, हिंगणगाव (खुर्द), शिवणी, वडियेरायबाग ही गाव दुष्काळग्रस्त यादीत अद्यापही समाविष्ट झालेली नाहीत. कडेगाव तालुक्यातील उर्वरित ३९ गावांना शासनाने टंचाईग्रस्त घोषित करून ८ कोटींची मदत दिली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु वंचित राहिलेली १७ गावे मात्र शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. येथे खरीप नंतर रब्बी हंगामही वाया गेला. ताकारी योजनेचे पाणी येथे मिळत असले, तरी अद्यापही हजारो हेक्टर शेती योजनेच्या कालव्यापेक्षा उंच भागात आहे. यामुळे ही शेती योजनेच्या लाभापासूनही वंचित आहे. सध्या या १७ गावातील बहुतांशी विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. कडेगाव तहसीलदार कार्यालयाकडून खरीप हंगामामध्ये ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांची अंदाजित यादी शासनाकडे हंगामाच्या मध्यावधीच्या दरम्यान दिली होती. यामध्ये या १७ गावांचा समावेश नव्हता. परंतु हंगाम संपल्यावर या गावांची खरीप पीक उत्पादन पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राजकीय नेते लक्ष घालणार?आमदार डॉ. पतंगराव कदम तसेच सत्ताधारी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख या दोन्ही नेत्यांनी लक्ष घालून या गावांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा येथील शेतकरी करत आहेत. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद लाड यांनी या १७ गावांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. शेकापचे सरचिटणीस अॅड. सुभाष पाटील यांनी कडेगाव तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभा करून या गावांवरील अन्यायाचा निषेध केला आहे.चिंचणीत कमी पाऊसकडेगाव तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद चिंचणी या भागात झाली आहे. तरीही हे गाव दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट नाही. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गावातील खरीप, रब्बी हंगामातील पिके वाळून गेली आहेत.
कडेगाव तालुक्यातील १७ गावांवर अन्याय
By admin | Published: April 11, 2016 11:19 PM