मिरज : बेडग (ता. मिरज) येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संगणक शिक्षणाचे शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गातून हाकलून देण्याच्या प्रकाराची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभाग सांगली कार्यालयाने गांभीर्याने दखल घेऊन, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाची चौकशी केली. चौकशीत विद्यार्थी व पालकांनी मुख्याध्यापकांच्या कारभाराविरोधात भूमिका मांडली. शिक्षणाधिकारी बुधवारी चौकशीचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचा हक्क आहे. बेडगेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संगणक शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गातून हाकलून लावत शिक्षणापासून वंचित ठेवल्याबाबत मुख्याध्यापकांना जाब विचारण्यात आला. मुख्याध्यापकांनी लेखी पत्र देऊन शुल्क वसुलीची व संगणक शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्याची कबुलीही दिली आहे. याप्रकरणी पालकांनी तक्रार केल्यानंतर पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे यांनी पालकांसह शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन, या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. शिक्षणाधिकाऱ्यांनी व रयत संस्थेच्या सांगली कार्यालयातील निरीक्षकांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत शाळेला भेट देऊन चौकशी केली. सात विद्यार्थ्यांचे जबाबही घेण्यात आले. संगणक शुल्क न दिल्याच्या कारणावरून तासास बसू न देता व्हरांड्यात बसविल्याचा जबाब विद्यार्थ्यांनी दिला आहे.मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार सुरू आहे, जमा झालेले शैक्षणिक शुल्क तास सोडून शिक्षकांना भरण्यास बँकेत पाठविणे, संगणक शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढणे, त्यांचा अवमान करणे, विद्यार्थ्यांसमोर सहकर्मचारी व शिपाई यांना अपशब्द वापरणे, पालकांशी उध्दट बोलणे, अशा मुख्याध्यापकांविरोधात लेखी तक्रारी पद्माजीराव पाटील, सुरेश नागरगोजे, संजय नागरगोजे यांच्यासह २२ पालकांनी संस्थेच्या निरीक्षकांकडे केल्या. शिक्षणाधिकाऱ्यांनीही या तक्रारींची दखल घेतल्याचे पालकांनी सांगितले.बुधवारी चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे. संस्थेचे निरीक्षकही संस्थेच्या वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)पालक आक्रमक : आंदोलनाचा इशाराशिक्षण विभाग व संस्था संबंधित मुख्याध्यापकांना पाठीशी घालणार की कारवाई करणार, याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. कारवाई न झाल्यास मिरज पंचायत समितीचे सभापती बुरसे यांनी पालकांसोबत शाळेसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बेडगच्या विद्यार्थ्यांवरील अन्यायप्रकरणी चौकशी
By admin | Published: December 07, 2015 11:38 PM