विटा : राज्यातील मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र ८ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातंग समाजाची माफी मागावी, अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा समतावादी महासंघाचे अध्यक्ष डॉ. विजय चांदणे यांनी दिला. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेनेच्या काळातही दलित मातंग समाजावर अन्यायच होत असल्याचा आरोप केला.विटा येथे समतावादी महासंघाच्यावतीने आयोजित केलेल्या सन्मान परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चांदणे बोलत होते. यावेळी माजी आ. राजू आवळे, प्रदेश कार्याध्यक्ष संदीप ठोंबरे, राज्य संघटक गणेश माने, अतुल चव्हाण, सचिन भिसे, सचिन कमाने उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी आ. राजू आवळे म्हणाले, दलित समाजाच्या अनेक संघटना राज्यभर कार्यरत आहेत. या संघटनांत महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून कामे करणे आणि सत्तेला प्रमाण मानून कामे करणे, असे स्पष्ट दोन प्रवाह सध्या दिसत आहेत. जे समाजाच्या प्रश्नावर बोलत होते, तेच आता सत्तेसाठी जातीयवाद्यांच्या वळचणीला गेले आहेत. त्यामुळेच आजही समाजावर मोठा अन्याय होत असल्याचे त्यांची सांगितले.या सन्मान परिषदेचे निमंत्रक व महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी, जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दलित समाजावरील अन्यायाबद्दल समतावादी महासंघाने आपली भूमिका विशद केली असून भविष्यातही आक्रमक लढा उभारणार असल्याचे सांगितले. सुरेश ऐवळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या परिषदेस संदीप धनवडे, संदीप सुतार, दिनकर ठोंबरे, विजय कांबळे, संजय ज. भिंंगारदेवे, महेश कांबळे, प्रा. दीपक तडाखे, नागरिक उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)
भाजप-शिवसेना काळात मातंग समाजावर अन्याय
By admin | Published: December 24, 2015 11:14 PM