सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव काँग्रेसमधील बंडखोरीमुळे झाला. त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठाकडे करणार का? , पक्षात वैचारिक भूमिका महत्त्वाची आहे. त्याशिवाय संघटन मजबूत होणार नाही. महापालिका निवडणुकीत एका गटाचे उमेदवार येतील, पण काँग्रेस पक्षाची सत्ता येणार नाही यावर काय उपाय करणार? काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचा पराभव केला. त्यामुळे निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्यांची सोळा वर्षे वाया गेली याला जबाबदार कोण? बंडखोर उमेदवाराचा प्रचार केलेल्यांना महापालिका उमेदवारी देऊ नका, त्यांच्यावर कारवाई करणार का? अशा प्रश्नांचा भडीमार मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीचे पक्ष निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या समोर शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातो, निष्ठावंतावर अन्याय आणि बंडखोरांना पायघड्या ही कसली संस्कृती? सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असते, सांगली विधानसभा निवडणुकीत जो प्रकार स्वकियांनी केला त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांच्या मनात असंतोष धुमसत आहे. अय्याजभाई नायकवडी, आशिष कोरी, अनिल मोहिते, अॅड्. अमोल चिमाण्णा, राजेंद्र कांबळे, बिपीन कदम, डी. पी. बनसोडे, प्रकाश बरडोले, भारती भगत, सनी धोतरे यांनी तर काँग्रेसचे गटबाजी करणारे नेतेच काँग्रेस संपवत आहेत असे सांगून काँग्रेस पक्ष कोण संपवत आहेत याची जंत्रीच मांडली.
वरिष्ठांना अहवाल देणार: रामहरी रुपनवरपक्षीनिरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले, महाराष्ट्रातील निवडक पराभवात पृथ्वीराज पाटील यांच्या पराभवाचा समावेश होतो. आपल्याच लोकांनी आपला परभव करण हे फार चुकीचे आहे. अशाने काँग्रेस पक्ष पुढे जाणार नाही. काँग्रेसचा पराभव करणे म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष बैठकांचे सत्र आयोजित केले आहे. मरगळ झटकून कामाला लागा, येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. बूथ यंत्रणा सक्षम करु या. सकारात्मक प्रतिसाद दिला तर काँग्रेस सत्तेवर येईल. सांगलीत जे घडले त्याचे दुःख आम्हालाही आहे. वस्तुस्थितीचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला दिला जाईल.