बेलदारवाडीत (ता. शिराळा) गावातील घरांच्या भिंतींवर विविध विषयांच्या शैक्षणिक फलकांची पाहणी प्रदीपकुमार कुडाळकर, सुहास रोकडे, विष्णू दळवी, बाजीराव देशमुख, आर. एस. माळी यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बेलदारवाडी (ता. शिराळा) येथे अभिनव उपक्रम जि. प. शाळा बेलदारवाडी यांनी लोकसहभागातून ‘माझं गाव शैक्षणिक पोस्टरचं गाव’ हा अभिनव उपक्रम राबविला आहे. पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमाचे फलक गावातील घरांच्या भिंतींवर लावल्याने आता घरांच्या भिंती बोलू लागल्या आहेत. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रप्रमुख सुहास रोकडे यांच्या संकल्पनेतून शिराळा केंद्रांमध्ये हा उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली होती आणि त्यावर कार्यवाही करण्यात आली. घरांच्या भिंतींवर अंकांची ओळख, पाढे, इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान असे विविध विषयांवर आधारित फलक लावण्यात आले आहेत.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू दळवी, बाजीराव देशमुख, बेलदारवाडी ग्रामसेवक आर. एस. माळी, अंगणवाडी सेविका विजयमाला पाटील, मदतनीस संगीता शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होते. मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक पोस्टरला पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गावामध्ये ज्या ठिकाणी पोस्टर लावलेले आहेत, त्याची उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाहणी करण्यात आली.
गटशिक्षणाधिकारी कुडाळकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, कोरोना काळात हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे.
यावेळी सरपंच धर्मेंद्र शेवाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक बिळास्कर, पोलीस पाटील योगेश मस्कर, तानाजी मदने, सुधीर बिळास्कर, शिवाजी मस्कर, सुनील मस्कर, हरिश्चंद्र जाधव, सुरेश शेवाळे, अविनाश शेवाळे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव यांनी या उपक्रमास मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक अमोल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी कदम यांनी आभार मानले.